राजकारण

भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार

इंधन दरवाढीवरून अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सलग बाराव्या दिवशी वाढ झाल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर आहे, असे म्हणत त्यांनी दरवाढीचा निषेध नोंदवला.

अशोक चव्हाण गेले काही दिवस दररोज महाराष्ट्रातील पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दल पेट्रोलची शंभरी जवळ आल्याचे उपरोधिक स्वरूपात निदर्शनास आणून देत आहेत. पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसाठी मागील केंद्र सरकारांना जबाबदार ठरवले होते. त्यालाही चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, एप्रिल २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलर असताना मुंबईत पेट्रोल ८० अन् डिझेल ६३ रूपयांना मिळत होते.

आज कच्चे तेल ६५ डॉलरला असताना मुंबईत पेट्रोल ९६.३० तर डिझेल ८७.३० रुपयांवर आहे. यासाठी केवळ मोदी सरकारची नफेखोरी कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत असताना मोदी सरकारने सतत कर वाढवले. सर्वसामान्यांच्या खिशावर तब्बल २० लाख कोटी रुपयांचा डल्ला मारला. तेच पंतप्रधान आज पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीसाठी यापूर्वीच्या सरकारांना जबाबदार धरतात, हे हास्यास्पद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button