राजकारण

भाजपला मोठा धक्का; रिटा बहुगुणा जोशींच्या मुलाचा समाजवादी पार्टीत प्रवेश

Big blow to BJP; Rita Bahuguna Joshi's son joins Samajwadi Party

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजप आणि समाजवादी पार्टीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. भाजप खा. रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांनी अखिलेश यांच्या उपस्थितीत समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

मयंक हे समाजवादी पार्टीत प्रवेश करणार अशी शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तवली जात होती. अखेर अखिलेश यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलंय. आझमगढमधील एका प्रचारसभेत अखिलेश यादव यांनी व्यासपीठावर मयंक यांचा हात उंचावत त्यांचं पक्षामध्ये स्वागत असल्याचं म्हटलं. तसंच मयंक यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केलाय.

मयंक जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मयंक हे समाजवादी पार्टीत प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. लखनऊमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या भेटीचे काही फोटो शेअर करत अखिलेश यादव यांनी मयंक जोशी यांच्याशी शिष्टाचार भेट असं म्हटलं होतं.

भाजप खा. रिटा बहुगुणा जोशी यांनी विधानसभा निवडणुकीत लखनऊ कँट मतदारसंघातून आपला मुलगा मयंक यांच्यासाठी पक्षाकडे तिकीटाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी पक्षातील वरिष्ठांना पत्रही लिहिलं होतं. मयंक विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षापासून पक्षाचं काम करत आहेत. ते तिकीटासाठी खऱ्या अर्थाने पात्र आहेत. गरज भासली तर आपण स्वत: खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार आहोत, असं रिटा बहुगुणा जोशी यांनी पत्रात म्हटलं होतं. मात्र, भाजपकडून या मतदारसंघात योगी सरकारमधील मंत्री ब्रजेश पाठक यांना मैदानात उतरवलं. रिटा बहुगुणा जोशी या अलाहाबादमधून भाजप खासदार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्या कँटमधून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकत त्या लोकसभेत गेल्या. त्यामुळे लखनऊ कँटमधून भाजपचे सुरेश तिवारी पोटनिवडणूक विजयी झाले होते.

आझमगढमधील रॅलीत अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. जे लोक गर्मी काढण्याची भाषा करत होते, ते सहाव्या टप्प्यात थंड पडले आहेत. सहाव्या टप्प्यात त्यांनी आपल्या घरावरील झेंडे खाली उतरवले आहेत. बाबा मुख्यमंत्र्यांना सहाव्या टप्प्यानंतर झोप येत नाही, असा जोरदार टोला अखिलेश यांनी योगींना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button