राजकारण

भाजपला मोठा धक्का! खडसेंच्या पुढाकाराने १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव : भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपला धडका कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा जोर अद्याप ओसरलेला दिसत नाही. एकनाथ खडसेंमुळे भाजपच्या अडचणीत वाढतच जाताना दिसत आहेत. कारण भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात दबदबा असलेल्या एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजप नगराध्यक्षासह १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपला हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. भुसावळमध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास भाजपच्या चिंता वाढताना दिसत असली, तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत, असेही सांगितले जात आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी कठीण जाणार आहे, असेही म्हटले जात आहे.

आमच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षांतर करताना पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष सोडचिठ्ठी दिलेली नाही. यामुळे पक्षाला निश्चितच फटका बसेल. पण तो फार काळ नसेल. कुणी पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष थांबत नसतो. एक गेला की दुसरा येतो. एकाचे काम थांबले की, दुसऱ्याला संधी मिळते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही आतापासून मोर्चेबांधणी सुरुवात करणार आहोत. पक्षातील नव्या लोकांना संधी आणि जबाबदारी देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे.

भाजपला हद्दपार करायचं ठरवलंय
आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संतोष चौधरी यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button