राजकारण

भाजपच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग अध्यक्षाला अटक

खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याचे पुरावे उपलब्ध

मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत,’ असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. थेट गृहमंत्र्यांनी असा दावा केल्याने या मुद्द्यावरून आगामी काळात भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. रुबेल हा भाजपाचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले? बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्नसुध्दा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले होते.

या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात प. बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा – 24 उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा – नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतमध्ये जावून चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवासी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली.

तसंच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया पच्छिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचे समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button