पटना : देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सामान्य जनतेला देखील ‘आपल्याला लस कधी दिली जाणार?’ असा प्रश्न पडला आहे. नुकतेच केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये देखील करोना लस देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये लस खरेदी करावी लागेल, असं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पण बिहार सरकारने यासंरदर्भात मोठी घोषणा केली आहे. बिहारमध्ये खासगी रुग्णालयात देखील करोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
“पूर्ण बिहारमध्ये करोनाची लस पूर्णपणे मोफत दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोफत करोना लसीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. याचा पूर्ण खर्च राज्य सरकारकडून उचलला जाईल”, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. बिहारमधील निवडणुकांवेळी अशा प्रकारचं आश्वासन देखील नितीश कुमार यांनी दिलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, ‘देशात सर्व सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांवर सरकारने ठरवलेल्या टप्प्यांनुसार मोफत लसीकरण केलं जाईल. त्यासोबतच आता खासगी रुग्णालयांना देखील लसीकरणाची परवानगी असेल. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या लशीसाठी २५० रुपये मोजावे लागतील. यामध्ये १०० रुपये सेवाशुल्क आणि १५० रुपये लशीचे शुल्क यांचा समावेश असेल’, असं जाहीर करण्यात आलं आहे.