राजकारण

बहुमत सिद्ध करता न आल्यानं पुडुचेरीत काँग्रेस सरकार कोसळलं

पुडुचेरी : पुडुचेरीमध्येकाँग्रेसला मोठा झटका लागला आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर पुडुचेरीतील सरकारल कोसळलं आहे. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. यापूर्वी सकाळी विधानसभेत पोहोचण्यापूर्वी व्ही. नारायणसामी यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. परंतु सदनात त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही.

यापूर्वी पुडुचेरीचे नवनियुक्त उपराज्यपाल तमिलिसाई सौदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार के लक्ष्मीनारायण आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ११ झाली. तर विरोधीपक्षांचे सध्या १४ आमदार आहेत.

पुडुचेरीच्या राज्यपालांनी सरकारला सोमवारी संध्याकाळपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. पुडुचेरी विधानसभेत ३३ जागा आहेत. यापैकी ३० सदस्यांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून होते, तर उर्वरित ३ सदस्यांची निवड केंद्र सरकारतर्फे केली जाते. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला होता. तर द्रमुकच्या ३ आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिलं होतं. यापैकी एका आमदारानं रविवारी आपला राजीनामा दिला. आतापर्यंत एकूण ५ आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर नारायणसामी सरकार संकटात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button