राजकारण

बंगालमध्ये हिंसा भडकली; भाजपच्या परिवर्तन यात्रेत रथाची तोडफोड

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच बंगालमध्ये हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या परिवर्तन रथ यात्रेवर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी हल्लेखोरांनी रथाच्या चालकाला मारहाण करून रथाची तोडफोड केली. तसचे रथातील मोबाईल आणि लॅपटॉपही लंपास करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री मानिकतला परिसरातील कांदापाडा येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रचारसभा, कॉर्नर बैठका आणि रथ यात्रा सुरू करण्यात आल्या आहेत. मानिकतला येथील कांदापाडा येथेही भाजपने शिक्रवारी परिवर्तन रथ यात्रा काढली होती. यावेळी एका टेम्पोचं रथात रुपांतर करण्यात आलं होतं. या रथ यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार करत असलेल्या कामाची माहिती देण्यात येत होती. तसेच राज्यातील ममता बॅनर्जी सरकारच्या कामांची पोलखोलही केली जाणार होती. या रथ यात्रेवर एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. तसेच मोबाईल फोन आणि लॅपटॉपही ठेवण्यात आले होते. हा सजवलेला रथ एका गोदामात ठेवण्यात आला होता. मात्र, टीएमसीच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन रथ यात्रेवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या रथावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी विटा फेकल्या. तसेच रथातील मोबाईल फोन आणि लॅपटॉपही गायब केले. एलईडी स्क्रीनही चोरण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. शुक्रवारी झालेल्या तोडफोडीनंतरपासून या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. फूलबागान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, टीएमसीच्या गुंडानीच हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, ही परिवर्तन रथ यात्रा बंगालच्या विविध भागात जाणार आहे. मात्र त्याआधीच रथ यात्रेवर हल्ला करण्यात आला असून त्यावरून बंगालची कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे हे तुम्ही पाहू शकता, असं भाजप नेते शमिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button