मनोरंजन

‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘रावण’ येणार एकत्र

मुंबई : ज्या दिवसापासून ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली तेव्हापासूनच त्यावर प्रदर्शित होणाऱ्या विविध वेबसिरीज, वेबफिल्म यांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली. आपली मराठी संस्कृती जपत त्याला आधुनिकतेची जोड देत आता ‘प्लॅनेट मराठी’ जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. मागील काही दिवसांत ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी ओरिजनलच्या तब्बल पाच वेबसिरीज आणि एका वेबफिल्मची घोषणा करण्यात आली. या दर्जेदार आणि नव्या कंटेंटची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आणखी एका बिग बजेट वेबसिरीजची घोषणा करण्यात आली आहे. वैशिष्टय म्हणजे या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’ आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांची आगामी निर्मिती संस्था ‘रावण’ एकत्र येणार आहे. अद्याप या वेबसिरीजचे नाव समोर आले नसले तरी याबाबतची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.

प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि मराठी सिनेसृष्टीला ‘रेगे’, ‘ठाकरे’ सारखे सुपरहिट सिनेमे देणारे प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. मात्र आता या वेबसिरीजच्या निमित्ताने ते एकत्र काम करणार आहेत. या वेबसिरीजविषयीच्या बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी ही बोल्ड सिरीज असणार आहे. यात अनेक कलाकारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून यात कोणाची वर्णी लागणार, हे वेबसिरीज आल्यावरच कळेल. ही वेबसिरीज साधारण जून -जुलै मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी’च्या लाँचदरम्यान प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी दिली.

या वेबसिरीजबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”या वेबसिरीजचा आशय, मांडणी आणि आवाका इथपर्यंतच मर्यादित न राहता ही कलाकृती सर्वार्थाने मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न फक्त या वेबसिरीजपुरताच मर्यादित नसून तो ‘प्लॅनेट मराठी’च्या सगळ्याच कंटेंटसाठी लागू असेल. या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक वेबसिरीजची कथा वेगळी असून त्याची काहीतरी खासियत असणार आहे. फक्त मराठीच नाही तर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहोचणार असल्याचे विशेष समाधान आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या निमित्ताने अभिजित पानसे यांचे वेब विश्वात पदार्पण तसेच वेब आणि मालिका विश्वातील आजवरची सगळ्यात बिग बजेट वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा आनंद अधिक आहे.” ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही अक्षय बर्दापूरकर यांनी या वेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button