प्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्सच्या कारला भीषण अपघात
लॉस एंजेल्स – जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स मंगळवारी झालेल्या एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार वुड्सच्या पायामध्ये अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. वुड्स आपली कार रोलसोव्हरला ड्राइव्ह करत असताना लॉस एंजेल्समध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर वुड्सला कारमधून बाहेर काढण्यासाठी खूप अडचणी आल्या. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
टायगर वुड्सला खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामध्ये वुड्सच्या कारचे मोठे नुकसान झाले. वुड्सच्या कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झालेला दिसत आहे. तसेच अपघातानंतर एअरबॅग उघडल्याचे दिसत आहे. तर कारचा दुर्घटनाग्रस्त भाग रस्त्याच्या शेजारी पडलेला दिसत आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास झाला. अपघात झाला तेव्हा वुड्स वेगाने गाडी चालवत होते. यादरम्यान वुड्सचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.
टायगर वुड्सचा समावेश जगभरातील सर्वश्रेष्ठ गोल्फपटूंमध्ये होतो. त्याने आतापर्यंत १५ प्रमुख गोल्फ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्या आहेत. वुड्स आधीच दुखापतींमुळे त्रस्त आहे. नुकतीच त्याने पाठदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी पाचव्यांदा शस्त्रक्रिया केली होती. त्यातून सावरत असतानाच हा अपघात झाला. त्यामुळे आता त्याला दीर्घकाळ गोल्फच्या मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.