राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड अखेर मंगळवारी १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पण भाजपकडून संजय राठोड यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. संजय राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले आहेत.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी इतके दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज अचानक प्रकट झाले. राज्याच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. त्यासंबंधीचे अनेक पुरावे देखील समोर आले आहेत. तरीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांना मूकसंमती आहे हे दिसून येतं, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राठोड यांनी आज माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी लावली आहे. त्यामुळे चौकशी पूर्णहोण्याआधीच बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन संजय राठोड यांनी केलं. त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची नेमकी कोणत्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे.

एका गंभीर प्रकरणातील आरोप असणारे अदृश्य मंत्री आज पंधरा दिवसांनंतर दृश्य झाले. त्यामुळे आतापर्यंत अदृश्य स्वरुपात असलेली कारवाई केव्हा दृश्य होणार? आता अदृश्य कारभार, केव्हा दृश्य होणार?, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली.

राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय : दरेकर


अखेर वनमंत्री संजय राठोड हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. मात्र, त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. ती आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा मृत्यूचे कारण काय याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. संजय राठोड म्हणतात की ते १० दिवस काम करत होते. मात्र, मंत्रीमंडळ बैठका तर झालेल्या दिसल्या नाही. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड करत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही; चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका


संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं म्हटलं. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सध्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला साजेसं नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरलं. बंजारा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु त्यांच्याच पक्षाच्या नेता आपलं वाईट कृत्य समाजाच्या मागे घालून झाकण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दल गर्दी जमवून असं कसं कोण करू शकतं याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. समाजाला वेठीस धरण्याच्या ट्रेंड आता राजकारणात सुरू होऊ लागला आहे. कितीही लोकं आली जोरात नारे दिले म्हणून तुम्ही खरे आहात असं होत नाही. बंजारा समाज धाडसी आहे. आम्हाला आदर आहे. परंतु तो आदर संजय राठोडांसाठी नाही. ते हत्यारे आहेत. आरोपींना कोणतीही जात नसते. जे अनुत्तरीत प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील. महिलांचा विषय हा राजकारणाचा विषय नाही, असंही वाघ म्हणाल्या.

काय म्हणाले राठोड?
बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडं राजकारण केलं जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे. या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत. या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल, असं राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सत्य तपासातून समोर येईल

“मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो. त्यांना सांभाळण्याचं काम केलं. आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल, अरूण राठोड कोण मला माहिती नाही. सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत. माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात. सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे. एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे,” अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button