अर्थ-उद्योग

पिरामल ग्रुप खरेदी करणार 84000 कोटींच्या कर्जात बुडालेली डीएचएफएल कंपनी

नवी दिल्ली – रिझर्व बँक ऑफ इंडियाने पिरामल ग्रुपला 37,250 कोटी रुपयांत डीएचएफएल (दिवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन) च्या अधिग्रहणासाठी मंजुरी दिली आहे. या डीलला डीएचएफएलच्या कर्जदात्यांच्या समितीकडूनही आधीच मंजुरी मिळाली आहे. सीओसीने पिरामल ग्रुपची कंपनी पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या समाधान योजनेला गेल्या महिन्यातच मंजुरी दिली होती.

पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल हे देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे व्याही आहेत. फायनांशिअल सर्व्हिसेस आणि फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये पिरामल ग्रुपचा व्यवसाय आहे. याशिवाय रिअल इस्टेटमध्येही ते आहेत. त्यांचा मुलगा आनंद पिरामल यांचा विवाह मुकेश अंबानी यांची एकुलती एक कन्या ईशा अंबानी सोबत झाला आहे. पिरामल ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे, ‘आरबीआयने पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्सच्या डीएचएफएल समाधान योजनेला मंजुरी दिली आहे.’ गेल्या आठवड्यातच डीएचएफएलने डिसेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीदरम्यान 13,095.38 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाल्याचे म्हटले होते.

डीएचएफएलवर जुलै 2019 मध्ये बँकांचे तब्बल 83,873 कोटी रुपयांचे कर्ज होते. यात सर्वाधिक 10,083 कोटी रुपयांचे कर्ज भारतीय स्टेट बँकेचे आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीची मालमत्ता 79,800 कोटी रुपये एवढी होती. यांपैकी 63 टक्के एनपीए झाली होती.

अमेरिकन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ओकट्री (Oaktree) नेही या शर्यतीत भाग घेतला होता. यात ओकट्रीला 45 टक्के मते मिळाली. याच वेळी या शर्यतीत सहभागी असलेल्या अदानी कॅपिटल या दुसर्‍या कंपनीला केवळ 18 टक्के मते मिळाली. ओकट्री यांनी डीएचएफएलसाठी 38,400 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर पिरामलने 37,250 कोटींची बोली लावली होती. मात्र, पिरामलच्या ऑफरमध्ये अग्रीम रोख रकमेचा वाटा अधिक होता आणि म्हणून या गटाने हा लिलाव जिंकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button