आरोग्य

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषध विक्रीस महाराष्ट्रात बंदी

नवी दिल्ली – पतंजली योगपीठाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे कोरोनावरील औषध जगासमोर आणलं. तसेच हा कोरोना बरा करण्याचा उपाय असून गुणकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनिल संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनिल देशमुख यांनी “सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही” असं स्पष्ट केलं आहे. “पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही” असं देखील देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरसशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ समूहाने कोविड-19 आजारावर ‘कोरोनिल’ या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती.

पतंजलीचं टेन्शन वाढलं असून ट्विटरवर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button