राजकारण

पंतप्रधान कार्यालय बिनकामाचे; कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व गडकरींकडे द्या; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

नवी दिल्ली : देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा जोरदार बसला आहे. दिवसागणिक तीन लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. केंद्रातील मोदी सरकारला कोरोनाचं संकट हाताळण्यात अपयश आल्याची टीका विरोधक करत असताना आता भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून कोरोनाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी हे सातत्याने मोदी सरकारच्या चुकांवर बोट ठेवत आहेत. स्वामींनी पुन्हा एकदा ट्विट करत मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोनाच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही, असं ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केलं आहे.

गडकरीच का असा प्रश्न एकाने विचारला असता सुब्रमण्यम स्वामींनी, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे, असं स्पष्टीकरण देखील दिलं.

एका युजर्सने पंतप्रधानांविषयी बोलताय का? असा सवाल केला असता मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्षवर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button