नाट्य परिषदेच्या हंगामी अध्यक्षपदी नरेश गडेकर
मुंबई : नाट्य परिषद अध्यक्षांच्या विरोधात गेलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी, विशेष बैठकीत ठराव आणून आणि तो बहुमताने मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी व पुढील सभा होईपर्यंत, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नरेश गडेकर यांची बहुमताने निवड केली.
यशवंत नाट्यसंकुलातील तालीम हॉलमध्ये नियामक मंडळाच्या ३९ सदस्यांची विशेष बैठक गुरुवारी घेण्यात आली. यावेळी नियामक मंडळाच्या सदस्यांनी पुढील कार्यवाहीसाठी नरेश गडेकर यांची नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड केली. यावेळी प्रसाद कांबळी हे त्यांच्या अध्यक्षपदाचे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. अध्यक्षपद रिक्त झाल्याने त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली व पुढील सभा होईपर्यंत नरेश गडेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीला उपस्थित असलेल्या ३९ सदस्यांपैकी ३७ सदस्यांनी नरेश गडेकर यांच्या बाजूने मतदान केले; तर दोन सदस्य तटस्थ राहिले. पुढील सभा येत्या १५ दिवसांत आयोजित करण्यात येईल. त्यात नियामक मंडळाच्या ५९ सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.