अर्थ-उद्योग

नवी मुंबई महापालिकेचा ४८२५ कोटींचा अर्थसंकल्प; आरोग्य सुविधांसाठी मोठी तरतूद

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२१-२२ साठी ४८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला. यात शहरवासीयांसाठी कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. पायाभूत सुविधांसह आरोग्यसेवेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद आहे. स्वच्छता सर्वेक्षणासह शहर सुशोभीकरणावरही भर देण्यात आला आहे.
महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह शहरवासीयांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते. आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी अर्थसंकल्प सादर करताना यामध्ये नागरिक केंद्रित योजनांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले. करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील वर्षभरात स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून सर्वाधिक १४०१ कोटी ४६ लाख रुपये व मालमत्ता कराच्या माध्यमातून ६०० कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनामुळे विकासकामे होऊ शकली नाहीत. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत १६२७ कोटी ४२ लाख रुपये संकीर्ण जमा आहे. यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ४८२५ कोटी नऊ हजार रुपयांचा झाला आहे. महानगरपालिकने नागरी सुविधांसाठीच्या योजनांसाठी १५६१ कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पामबीच रोडसह शहरात महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपुलांचे नियोजन करण्यात आले आहे. रस्ते, पदपथ, गटारे यांसाठी तब्बल ५८८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
कोरोनामुळे आरोग्य सुविधांचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात आल्याने गतवर्षीपेक्षा आरोग्य विभागासाठी १८० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात येणार आहेत. स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासह सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शहरात स्मार्ट पार्किंग योजना राबविण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले असून, स्वच्छतेसह शहर सुशोभीकरणासाठीच्या कामांचाही अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button