राजकारण

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाचा अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे भाजपला मेगागळती लागली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेनेच्या नगरसेवकाने पक्षाला रामराम ठोकला असून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. पण महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडीचं राजकारण रंगलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांचा शिवसेनेला रामराम ठोकला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या घरवापसीला काँग्रेसने नकार दिला. त्यामुळे नामदेव भगत यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नामदेव भगत मागील निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत गेले होते. आता राजकीय हालचालींना वेग आल्यामुळे भगत यांनी सेनेची साथ सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

गणेश नाईक यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीची साथ सोडत कमळ हाती घेतलं. नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनीही पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. नाईक यांचं पक्ष सोडून जाणं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. दुसरीकडे, गणेश नाईक यांनीही आपला बालेकिल्ला अजिंक्य राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर शिवसेनाही शहरात आपली ताकद राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंजक ठरणार, यात अजिबातच शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button