
कोलकाता – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी रात्री समाज माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी होईल अशा सर्व धार्मिक, राजकीय-सामाजिक कार्यक्रम, यात्रांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले. तसेच, पुढील आठवडाभर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, पाळली जाणारी शिस्त याचा आढावा घेऊन राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
फडणवीस सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाचा प्रचार करत आहेत. यावेळी, येथील पत्रकारांनी फडणवीस यांना सीबीआय, आंदोलन आणि महाराष्ट्रातील कोरोनासंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, कोरोनाचे नियम सर्वांनीच पाळायला हवेत, असे ते म्हणाले. ‘कोरोनाविरुद्ध आपल्या सर्वांनाच लढाई लढायची आहे. पण, महाराष्ट्रातच कोरोना सातत्याने का वाढतोय, याचीही विचार सरकारने करायला हवा. यापूर्वीही महाराष्ट्रातच सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले, सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाल्या आहेत. आता, कोरोनाची दुसरी लाटही महाराष्ट्रातच जाणवत आहे. त्यामुळे, कोरोनाला रोखण्यात सरकारला कुठं अपयश येतंय. सरकार का कमी पडतंय, याचा विचार सरकारने करायला हवा,” असे फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, दुसरा लॉकडाऊन हा उपाय नाही, पण कोरोना नियमावलीचं सर्वांनीच पालन करायलं हवं. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचं आवाहन आम्ही जनतेला करतो, असेही फडणवीस यांनी म्हटलं.