गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यासह आठ जणांना अटक
पुणे: कुख्यात गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी आलिशान वाहन पुरविणाऱ्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ जणांना कोथरुड पोलिसांनी केली अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी सहा अलिशान कारही जप्त केल्या.
गजा मारणेला तुरुंगातून आणण्यासाठी जी लँड क्रुझर कार वापरण्यात आली होती, ती राहुल दळवी यांनी आणली होती. राहुल दळवी हे वडगाव शेरीतील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. त्याने वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नारायण गलांडे यांच्याकडून कामासाठी त्यांची कार घेतली होती. हे प्रकरण तापल्यानंतर राहुल दळवी गायब झाला होता. मात्र, आता पुणे पोलिसांनी राहुल दळवीसह आठ जणांना अटक केली आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर गजा मारणे फरार झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आली होती. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत.
संबंधित पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी अचानक छापेमारी सुरु केली आहे. आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मारणेच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार आहे.
ती लँडक्रुझर कार होणार जप्त?
गजा मारणे ज्या गाडीत बसून तळोजा कारागृहातून बाहेर पडला ती लँडक्रुझर कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची होती. या गाडीची सध्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांकडेच ही कार आहे.