मुक्तपीठ

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच घेण्याची गरज

- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. रुग्णवाढ कायम राहिल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवरही संकट येणार असल्याचं स्पष्ट होतंय. १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत विद्यार्थी आग्रही आहेत. शिक्षण जर ऑन लाईन झालं तर परीक्षा ऑफ लाईन कशी असा प्रश्न आता विद्यार्थी करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफ लाईनच पध्दतीनेचं घेतल्या पाहिजे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याबाबत आग्रही आहे.

राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे केले आहे. रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकावर संकट उद्भवण्याची भीती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, करोनामुळे पुन्हा परीक्षा पद्धतीमध्ये किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास कमी मनुष्यबळावर काम करणाऱ्या शिक्षण मंडळालाही नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे. या सगळ्या परिस्थितीवर राज्यात ऑनलाईन परीक्षा घेता येईल का,यावर देखील विचार होताना दिसतो आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर १० वि व १२ विच्या विद्यार्थ्याची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करावं असं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची मागणी होत
असली तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ होईल.विद्यार्थ्यांना प्रमोट केल्याने विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधकारमय होईल. प्रमोट केल्याने पुढील प्रवेश कोणत्या गुणवतेच्या आधारे करायचा.?. त्याचे निकष कोणते…टक्केवारी कोणती..? असे नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण होतील.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑन लाईन परीक्षा घेण्यात आल्या. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांजवळ गुणात्मक दर्जा नसल्याने कंपन्यांनी या विद्यार्थ्यांना नोकरी देखील दिली नाही. रोजगाराअभावी हे विद्यार्थी खाली आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट न करता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑन लाईन न घेता ऑफ लाईनच घेतल्या पाहिजेत.

राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पालकांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी करण्यात आली. दहावीच्या परीक्षेला साधारण १७ लाख, तर बारावीच्या परीक्षेला १५ लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घ्यायच्या झाल्यास, सुमारे ३२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागेल. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. त्याचप्रमाणे विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ निर्माण झाला. सध्याच्या स्थितीत ऑनलाइन परीक्षा घेण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. त्याचप्रमाणे या परीक्षेत गैरप्रकार व गोंधळ होण्याची शक्यता अधिक असल्याने, मंडळाकडून ऑफलाइन परीक्षेची तयारी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button