त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही मिळवून दिलं? .. नाव, पैसा, प्रसिद्धी, इभ्रत… पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पॆसा उरला ना इभ्रत … सर्वात महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला आणि ना सून! .. अगदी एकाकी आयुष्य त्यांच्या वाटेला आलं. थोडी कृपा झाली ईश्वराची म्हणून त्यांची नात त्यांच्यासोबत आहे! *संतोष आनंद* हा तो दुर्दैवी कलाकार!
इक प्यार का नगमा है…
मेघा रे मेघा रे…
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है…
मोहब्बत है क्या चीज…
सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा… त्याकाळी नावाजलेला …दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा … एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्र यांच्या वलयात रहाणारा गीतकार..! सगळं ठीक होतं.. एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात.. पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला…अडकवला गेला आणि अडकतच गेला… फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेलं.. खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीतून अधिकच रुतत गेला! एक दिवस निर्णय घेतला आणि पत्नी व ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीसमवेत एका भरधाव आगगाडीखाली झोकून दिलं. तो आणि त्याची पत्नी तर गेले पण अंगावर गंभीर जखमा झालेली मुलगी सुदैवाने वाचली. कदाचित संतोष आनंद यांना आधार द्यायलाच असावी! मुलाने मृत्यूपूर्वी १० पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली.. मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले पण त्यावर अजूनपर्यंत तरी काही झालं नाही.. झालं तरी मुलगा, सून परत मिळणार नाहीत.. ते दिवस फिरून येणार नाहीत!
जो बीत गया वो दौर अब फिर न आएगा
मेरे दिल में तेरे सिवा कोई और न आएगा
घर फुक दिया हमने, अब राख उठानी है..
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है…
आजोबा आणि नात दोघंच उरले एकमेकांसाठी पण दुर्दैवाचा फेरा अजून सुटला नाही.. गीतकार संतोष आनंद अपंग झाले.. ३-४ वेळा पायाचं ऑपरेशन झालं. व्हील चेअरवर आले.. हातपाय प्रचंड थरथरतात… आवाज कापतो.. जगायला पैसा नसला तरी लेखणीत दम मात्र पाहिलेसारखाच आहे..!
कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो, आना और जाना है
दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है…
काल इंडियन आयडॉल कार्यक्रमात संतोष आनंद यांची कथा ऐकून अगदी भडभडून आलं. कौतुक वाटलं ते नेहा कक्करचं. त्यांना पाहून ती अगदी हमसून हमसून रडली.. त्यांच्या गळ्यात पडून रडली.. त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला.. त्यांना भावनिक धीर दिला.. मुख्य म्हणजे ५ लाखांची आर्थिक मदत केली!.. स्वाभिमानी संतोष आनंद यांनी ती त्याही परिस्थितीत नम्रपणे नाकारली.. ‘मी अजूनही काम करतो.. इकडे तिकडे जातो..’ हे सांगताना त्यांना आवाज भरून आला आणि ऐकताना आमचे डोळे! नेहाने त्यांना ती भेट तितक्याच स्नेहाने स्वीकारायला भाग पाडलं.
नेहाबद्दल मी वर्षांपूर्वीच एफबीवर पोस्ट लिहिली होती जेव्हा तिने अशाच एका फुटपाथवर हार्मोनियमवर कला सादर करून गुमनामीत जगणाऱ्या बॉलिवूडच्याच एका अवलियाला १ लाखाची मदत जाहीर केली.. मला तिचं रडणं कधीच नाटकी वाटलं नाही.. यापूर्वीदेखील तिने कितीतरी गरीब स्पर्धकांना १ लाख -२ लाख अशी आर्थिक मदत केली आहे. तशी ती नावाजलेली असली तरी इतर अनेक सेलिब्रिटीजसारखी वर्षानुवर्षे प्रस्थापित नाही. १० वर्षांपूर्वी इंडियन आयडॉलमधूनच वर आली आहे .. गरिबी पाहिलेली आहे.. वयाने लहान आहे…पण दानत असायला सामाजिक जाण असावी लागते, ती तिच्यात ठासून भरली आहे. कुणाचीही समस्या ऐकली की तिचा हात लगेच पुढे येतो मदतीसाठी.. पैसा असला तरी दानत असतेच असं नाही! गायिका पलक मुच्छल नंतर मला मनापासून आदर वाटलेली ही दुसरी संवेदनशील गायिका! ईश्वर तिला खूप सुखी आयुष्य आणि भरभरून यश देवो!!..
कालचा इंडियन आयडॉल कार्यक्रम फारच सुंदर झाला.. हृदयस्पर्शी झाला…अगदी पुन्हा पहावा असा!.. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची अवीट गाणी.. तोडीचे स्पर्धक.. सर्वात महत्वाचं म्हणजे काळाआड गेलेल्या एका अशा असामान्य गीतकाराची ओळख ज्याबद्दल आपण कधी ऐकलं नाही आणि तशी शक्यताही नाही! .. तसेही आपण गाणी ऐकतो पण त्यामागील गीतकार संगीतकार यांच्याबद्दल फार कधी जाणूनही घेत नाही! संतोष आनंद यांना जगासमोर आणल्याबद्दल इंडियन आयडॉलचे खूप खूप आभार!.. त्यांचे ‘किसी ने तो याद किया..’ हे शब्द काळजाला घर करून गेले! घळघळा रडले मी आणि ते सर्वच रडले असतील ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला…
आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है…
असामान्य शब्दांचे धनी गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य देवो ही मनःपूर्वक इच्छा!