आरोग्य

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेचा फज्जा उडणार?

third phase of vaccination campaign is in trouble

नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढाईत लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. पण अनेक राज्यांमध्ये लसीची उपलब्धता नसल्याने १ मे पासून म्हणजे शनिवारपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी लसीकरण मोहिमेची तयारी नसल्याचं म्हटलं आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना करोनाविरोधी लढाईत लसीकरण हाच रामबाण उपाय असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याचा निर्णय घेतला. लसीकरण मोहिमेतला हा तिसरा टप्पा सुरू असताना अनेक राज्यांनी मात्र आपली तयारी नसल्याचं सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे लसीचा अभाव.

लसीकरणासाठी पुरेसे डोस नसल्याने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करता येणार नाही, असं महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने म्हटलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस गंभीर होत असताना लसीच्या तुटवड्यामुळे धोका आणखी वाढण्याची भीती आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी आम्ही संपर्क केला. पण लसींचे डोस उपलब्ध नसल्याने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणं शक्य होणार नाही. लसींचे डोस उपलब्ध होताच, ही लसीकरण मोहीम सुरू केली जाईल, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.

गुजरात सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला कोविशिल्ड लसीच्या २ कोटी डोसेस आणि भारत बायोटेकच्या ५० लाख डोसेसची ऑर्डर दिली आहे. लसीचा हा साठा उपलब्ध होताच येत्या १५ दिवसांत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावं, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले.

दिल्ली सरकारने लस उत्पादक कंपन्यांशी संपर्क केला. पण आपल्याकडे सध्या लस उपलब्ध नसल्यांचं कंपन्यांनी सांगितलं. तसंच लस उपलब्ध होताच, त्याचा पुरवठा आपल्याला केला जाईल, असं कंपन्यांनी म्हटल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.

तामिळनाडू सरकारनेही दीड कोटी डोसेसची ऑर्डर दिला आहे. पण शनिवारपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावरून सरकामध्ये अनिश्चिततेची स्थिती आहे. आमच्याकडे जूनपर्यंत लस उपलब्ध होणार नाही, असं एका कंपनी सांगितलं. यामुळे १ मेपपासून लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत निश्चित नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

१० लाख डोस मिळत नाही तोपर्यंत लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करणार नाही, असं पंजाब सरकारचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग यांनी सांगितलं. राजस्थान सरकारकडेही लसीचा तुटवडा आहे. १५ मेपर्यंत लस उपलब्ध होणार नाही, असं लस उत्पादक कंपन्यांनी सांगितलं आहे, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी दिली.

लसीकरण मोहिमेतील राज्यांच्या कामगिरीनुसार लसींच्या डोसेसचा पुरवठा केला जात आहे. आम्ही राज्यांना १६ कोटी डोसेसचा पुरवठा केला आहे. त्यापैकी १५ कोटी डोसेस दिले गेले आहेत. अजूनही १ कोटी डोसेस शिल्लक आहेत. तसंच आणखी काही लाख डोसेस येत्या २ ते ३ दिवसांत पुरवले जातील. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून लसीच्या पुरवठ्यात एक दिवसाचाही खाडा झालेला नाही, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button