स्पोर्ट्स

डिव्हिलिअर्सची झंझावाती खेळी; थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी

De Villiers' stormy play; Royal Challengers wins opening match

चेन्नई : एबी डिव्हिलियर्सने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १४ व्या मोसमाची विजयी सुरुवात केली. सलामीच्या लढतीत आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला २ विकेट राखून पराभूत केले. मुंबईचा संघ २०१२ पासून आपली सलामीची लढत जिंकू शकलेला नाही. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात मुंबईने आरसीबीला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन सुंदर (१०) आणि कर्णधार विराट कोहली (३३) यांनी आरसीबीच्या डावाची चांगली सुरुवात केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत २८ चेंडूत ३९ धावांची खेळी केल्यावर त्याला मार्को जेन्सनने बाद केले. तसेच शाहबाझ अहमद (१), डॅन क्रिस्टियन (१) आणि कायेल जेमिसन (४) हे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, डिव्हिलियर्सने २७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला.

हर्षल पटेलचा भेदक मारा

त्याआधी हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १५९ धावांवर रोखले होते. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिस लिन यांनी मुंबईच्या डावाची सावध सुरुवात केली. रोहित १९ धावांवर धावचीत झाला. लिनने मात्र खेळपट्टीवर वेळ घालवल्यावर फटकेबाजी केली. त्याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. त्याला ३१ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवची साथ लाभली. यानंतर मात्र ईशान किशन (२८) आणि हार्दिक पांड्या (१३) वगळता मुंबईच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे मुंबईने २० षटकांत ९ बाद १५९ धावा केल्या. हर्षलने २७ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या.

शेवटच्या चेंडूवर विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुने मुंबईवर निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. परंतु गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलने शेवटची धाव घेत सामना जिंकण्यात मोलाची भूमिका निभावली.

हर्षल पटेल सामनावीर

हर्षलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 27 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे 5 पैकी 3 विकेट्स त्याने सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. हर्षल आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कारना सन्मानित करण्यात आले.

रोहित शर्माचा 12 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत

या सामन्यात मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा हर्षल पटेल जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने आज 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबईविरोधात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड याआधी रोहित शर्माच्या नावावर होता. होय! सध्याचा मुंबईचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने हैदराबाद डेक्कन चार्जर्स (Hyderabad Deccan Chargers) संघाकडून खेळताना मुंबईविरोधातील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. रोहितने मुंबईविरोधात 6 धावात 4 बळी घेण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे यात रोहितने हॅट्ट्रिकदेखील घेतली होती. रोहितचा हाच रेकॉर्ड आज हर्षलने मोडीत काढला आहे.

RCB चा तिसरा सर्वोत्तम गोलंदाज

दरम्यान, हर्षल पटेलने आज अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी हर्षलने केली आहे. हर्षलने आज 27 धावांत 5 बळी मिळवले आहेत. आरसीबीकडून याआधी गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि जयदेव उनादकटच्या नावे होती. उनादकटने 25 धावांत 5 बळी घेण्याचा विक्रम केला होता. तर दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने 5 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली होती.

मुंबईचा सलग ९ वर्षे सलामीला पराभव

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम ठेवली आहे. 2013 पासून आतापर्यंत दरवर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत होत आहे. ही पराभवाची मालिका यंदा खंडित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु मुंबईतला ही पराभवाची मालिका थांबवता आलेली नाही. सलग 9 वर्ष मुंबई सलामीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. या 9 वर्षात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, परंतु सलामीच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button