मुक्तपीठ

टेकू, मिठाचा खडा आणि वाचाळ संपादक

- मुकुंद परदेशी

राम राम मंडळी, खरं म्हणजे ‘राम राम’ जपणाऱ्यांना विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेली मंडळी आहोत ; म्हणून शक्यतोवर आम्ही कोणालाही राम राम करण्याचं टाळत असतो ,पण काही प्रथा सहजासहजी एखाद्या युती किंवा आघाडीसारख्या मोडता येत नाहीत, म्हणून तुम्हाला राम राम केला. तर काय सांगत होतो की, खरं तर आमच्या या तिनरंगी, बहुढंगी महातमाशा पार्टीतर्फे आम्ही ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असा बहारदार महातमाशा सादर करण्याचं ठरवलं होतं , पण त्यात काम करणाऱ्या कलाकारांच्या स्वभावामुळे ते ‘ वरूनही तमाशा आणि आतूनही तमाशाच’ झालेलं आहे. असो.

आमच्या महातमाशा पार्टीचे चालक, मालक, पालक आणि संचालक असलेल्या भानामतीकर साहेबांनी तीन वेगवेगळ्या डबघाईस आलेल्या तमाशा पार्ट्यांना (त्यातली एक त्यांचीच होती) एकत्र आणून एकच महातमाशा पार्टी तयार केली आणि त्या कमळाबाई नागपूरकरीनच्या तमाशा पार्टीचे बारा वाजवून टाकले. (तशी आमच्या साहेबांची जन्मतारीख बारा असल्यामुळे चुटकीसरशी ते कोणाचेही बारा वाजवतात. रात्री बारापर्यंत एखाद्या सोबत मीटिंगमध्ये बसून सकाळी सभागृहात त्याचेच बारा वाजवण्याचे कसब आमच्या साहेबांकडेच आहे .) एकट्याने तमाशा पार्टी चालवून पोट भरणे कठीण झाल्यामुळे तिन्ही तमाशा पार्ट्यांनी ‘ मरता क्या नही करता !’ या उक्तीप्रमाणे असं करण्यासाठी मंजुरी देऊन टाकली. पुन्हा असो. आमच्या या तीनरंगी, बहुढंगी महातमाशा पार्टीत तर तसे एकसे बढकर एक कलाकार आहेत ,पण तुम्हाला त्यातल्या मोजक्याच कलाकारांचा थोडासा परिचय करून देतो.

१) नाना ‘टेकू’वाले – नाना आधी कमळाबाई नागपूरकरीनच्या पार्टीत होते , पण तिथले मालक थोडे हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्यामुळे नानांनी ती पार्टी सोडली. आताही या महातमाशा पार्टीच्या प्रयोगात नानांंच मन रमत नाही. आपली स्वतंत्र तमाशा पार्टी असावी अशा मताचे नाना आहेत, पण दिल्लीतल्या मालकीणबाईंच्या मर्जी शिवाय ते काहीच करू शकत नाहीत. तरीही ही महातमाशा पार्टी लवकर गुंडाळली जावी म्हणून ते अधूनमधून ‘ आमच्या टेकुवरच तुम्ही टिकून आहात हे विसरू नका .’ असं बोलून इतरांना डिवचत असतात.

२) दादा ‘मिठाचा खडा’वाले – हे या महातमाशा पार्टीतलं एकदम बेरकी पात्र आहे. भानामतीकर साहेब यांचे काकाच असल्यामुळे यांना शंभर गुन्हे माफ आहेत. एखादं धरण जर पावसाने भरत नसेल तर ते एका खास ‘वैयक्तिक विधीने’ भरण्याची यांची क्षमता आहे. हा महातमाशा पार्टीचा प्रयोग सुरू करण्याची तयारी सुरू असतानाच हे पहाटे पहाटे आपल्याच काकांच्या हातावर तुरी देऊन कमळाबाई नागपूरकरीनच्या पार्टीत सामील झाले होते , पण काकांनी बहात्तर तासातच त्यांना परत आणलं . असे हे काकांच्या प्रयोगात स्वतःच मिठाचा खडा टाकणारे दादा आता मात्र इतरांना ‘कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका.’ म्हणून दम देत फिरतात.

३) वाचाळ संपादक – आपला कंड शमवण्यासाठी यांना आपली लेखणी कमी पडते म्हणून की काय पण हे महाशय वर्तमानपत्रातून ‘ठोकाठोकी’ केल्यावरही नंतर चार पत्रकारांना जमा करून आपल्या फाटक्या तोंडाची शांती करीत असतात. त्या नादात कधी कधी ते ज्यांच्याकडे पगारी आहेत त्यांच्यावरसुद्धा टीका करतात ! अर्थात मग मालकाकडून त्यांचे पंख छाटल्या गेल्याची बातमी इतर वर्तमानपत्रांंत झळकते , पण यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसते. ‘माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही.’ हे ते अभिमानाने सांगतात. ‘ गिरे तो भी टांग उपर ‘ असा त्यांचा नेहमीच पवित्रा असतो !

तर मंडळी ही होती आमच्या महातमाशा पार्टीतल्या काही मोजक्याच कलाकारांची अगदीच थोडक्यात ओळख. ‘ सध्या आमच्या या महातमाशा पार्टीची अवस्था ‘ विठ्ठला , जड झाले ओझे ‘ अशी झाली आहे , त्यामुळे सगळ्याच कलाकारांचा परिचय देण्याचा मोह टाळतो आहे . ‘आपस में लड़ लड़ के बचेंगे तो और भी बाकियों का परिचय देंगे !’ चला, आमच्या महातमाशाचा आहे तोपर्यंत आनंद लुटूया .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button