राजकारण

चित्रा वाघ यांचे पती किशोर यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमभ भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्याविरोधात बोललेले आवडत नाही. असे जर कुणी काही बोलले तर त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात. या प्रकरणात भाजपा हा चित्रा वाघ यांच्यासोबत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button