खासदार नुसरत जहाँने भाजप प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉलिवूड कलाकारांनी राजकारणाच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. आता या यादीत बंगाली अभिनेते यश दासगुप्ता यांचं नाव जोडलं गेलं आहे. दासगुप्ता हे तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. पण दासगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे नुसरतही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चा नुसरत यांनी फेटाळून लावल्या आहेत. माझी बांधिलकी तृणमूलशी आहे. मी तृणमूलची लॉयल सैनिक आहे, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं आहे.
यश दासगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नुसरत जहाँ यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका व्यक्त केली. मी तृणमूलची लॉयल सैनिक आहे. मी तृणमूलमध्येच राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यश दासगुप्ता यांनी चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दासगुप्ता हे भाजपमध्ये आल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 2021मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे बॉलिवूड आणि बंगाल सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या तृणमूलकडे वाढत्या ओढ्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्यंतरीच्या काळात दासगुप्ता आणि नुसरत जहाँ एकत्र राजस्थानच्या ट्रीपवर गेले होते. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या अफवा जोरात पसरल्या होत्या. नुसरत यांनी 2019मध्ये निखील जैन या उद्योजकाशी लग्न केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संबंधामध्ये वितुष्ट आलं असल्याची चर्चा आहे. परंतु त्याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. गेल्याच आठवड्यात यश दासगुप्ता यांनी त्यांचा भाजप प्रवेश ही मोठी गोष्ट नाही असं सांगतानाच तसेच आपलं नाव ज्यांच्याशी जोडलं जातयं त्या तृणमूलसाठी प्रचार करत असल्याचं म्हटलं होतं.