
महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असून महाराष्ट्रात तर या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून मोठा उद्रेक निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोनसे ते तीनशे असलेला कोरोना बाधितांचा आलेख या आठवड्यात दररोज वाढत असून, प्रशासनाला धडकी भरली आहे. नागपूरचाच केवळ विचार केला तर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७७४ नवे रुग्ण बाधित आढळून आल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.कोरोनावर लस उपलब्ध झाल्यावर देखील कोरोनाचं संक्रमण एकदम का वाढत आहे,हा महत्वाचा प्रश्न या अनुषंगाने निर्माण होतो आहे.याला वेगवेगळी कारणे कारणीभूत असली तरी नागरिकांचा बेजबाबदारपणा,शासन व प्रश्नाणाचा सुस्तपणा, आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदी कारभार , व्यवस्थेचा अभाव,डॉक्टरांचा हलगर्जीपणा,या कारणांमुळे कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचात निवडणुकांमुळे कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला.ग्रामपंचायत निवडणूका करोनाच्या पार्श्वभूमीवर
घेण्यात आल्या. या निवडणुका घेण्यात शासनाला घाई झाली होती.परिस्थिती आटोक्यात आल्यावर या निवडणुका घेतल्या असत्या तर कोरोनाचं संक्रमणाला कुठंतरी थांबवता आला असता.मात्र सरकारने घाईघाईने या निवडणुका घेण्याचे ठरविले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या.मात्र या मार्गदर्शन तत्वांचे पालन न शासन स्तरावर न नागरिकांच्या स्तरावर झाले.
मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलची सेवा कोरोना संसर्गामुळं गेल्या अनेक महिन्यापासून बंद होती. अशात फेब्रुवारीच्या सुरुवातीला कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र दिसल्यानं १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवल्याने कोरोनाचे संक्रमण वाढले. . आता मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्यानं लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता गरज आहे.
मागील दोन आठवड्यांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांचया संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. जानेवारी महिन्याचा विचार केल्यास दिवसाला साधारणतः ३०० ते ३५० रूग्ण रोज आढळून यायचे. मात्र, हा आकडा आता दुप्पटीनं वाढला आहे. सध्या दिवसाला जवळपास ६०० ते ६५० रूग्णांची नोंद होत असल्याची स्थिती आहे.
सोशल डिस्टनिंग पाळण्याचे सक्त सूचना न निर्देश असताना सरकारी कार्यालयासह सार्वजनिक ठिकानांच्या स्थळी या नियमांचा फज्जा उडाल्याचे रोज दिसून येत आहे.लग्न समारंभ व इतर प्रासंगिक कार्यासाठी ५० लोकांची परवानगी असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे.मात्र कोण लक्ष घालणार..? शासन व प्रशासनाच्या बेमुर्वत पणामुळे कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याने कोरोनाचे संक्रमन वाढत आहे.सोशल डिस्टनिंग अभावी कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.
कोरोनाच्या संक्रमणाची दुसरी लाट हिवाळ्यात येण्याचा धोका जास्त असतो थंडीच्या दिवसांना सुरूवात होताच या रुग्णसंख्येत वाढ होते,असं तज्ज्ञांनी स्पष्ट केले युरोपातही रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यावरून कोरोनाची लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता आहे हे स्पष्ट करण्यात आलं होतं व तज्ज्ञांनी तशा सूचना देखील दिल्या होत्या.
ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली. हिवाळ्यात ब्रिटनमध्ये १.२० लाखांपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात असा अंदाज वर्तवला गेला होता कोरोना व्हायरस नोव्हेंबरच्या दरम्यान चीनमधून इतर ठिकाणी पसरला होता म्हणून हिवाळ्याचे दिवस जसजसे जवळ येतील तसतसं संक्रमणाचा धोका वाढू शकतो असं मत काही तज्ज्ञांचे म्हणणं होतं ते खरं ठरलं याचा प्रत्यय बदललेल्या हवामानात बघायला मिळत आहे.
हिवाळ्याच्या वातातवरणात व्हायरल इन्फेक्शन, फ्लूसारखे इतर आजार वाढण्याची शक्यता असते. कोरोनामुळे हे व्हायरल संक्रमण पसरत असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. पण आतापर्यंत कोणत्याही संशोधनातून ही बाब सिद्ध झालेली नाही. तरी देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.सध्या थंडी देखील वाढली आहे.त्यातच ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.याचा परिणाम म्हणून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
आरोग्याची ‘साक्षरता’ यासाठी सरकारने विशेष असे प्रयत्न करण्याची हीच ती वेळ आहे. सध्या उपलब्ध असलेली उपचारपद्धती, कोणत्या रुग्णांनी कधी रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या आजाराबद्दल असणारे गैरसमज त्याबद्दल असणारी अस्पृश्यता याचे वेळीच खंडन करून त्यांचे प्रबोधन केले पाहिजे.
मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. लाखांचा टप्पा पार केला असून मृतांचा आकडा दररोज हजारांपेक्षा अधिक पटींनी वाढतो आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीत, आहे त्या साधनसामुग्रीत आरोग्य व्यवस्था काम करत आहे. मात्र रुग्णसंख्याच इतकी झपाट्याने वाढत आहे कि त्या व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. मुंबई स्थिरस्थावर झाली असताना तर या शहराची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरात तर कोरोनाने थैमान घातले आहे, काही ठिकणी रुग्णांना ‘ऑक्सिजनची’ टंचाई भेडसावत आहे. काही दिवसापासून मुंबई शहरातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या पुन्हा वाढीस लागली आहे.
सध्या राज्यातील सर्व यंत्रणा कोरोनाच्या आजाराच्या उपाय योजनांभोवती फिरत असताना अजूनही शासनाला हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. संपूर्ण राज्यात कुठे ना कुठे नवनवीन समस्या निर्माण होतच आहे. काही ठिकाणी कोरोना आजाराच्या पुनः संसर्गाच्या संशयास्पद प्रकरणे सापडली आहे.इंग्लड मधून आलेला स्ट्रेनस कोरोनाचा नवा प्रकार मात्र त्यापासून आज कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त धोका नसला तरी आरोग्य व्यवस्थेला त्यांच्यावरही बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे. मोठ्या संख्यने रुग्ण घरी गेले आहे ही गोष्ट चांगली आहे. याचा अर्थ आपल्या डॉक्टरांचे रुग्णावरील उपचार योग्य पद्धतीने सुरु आहे रुग्ण औषधांना प्रतिसाद देत आहेत. मात्र यामुळे या आजाराचा संसर्ग कमी झाला असा होत नाही. दररोज नवीन होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण ज्यावेळी कमी व्हायला लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने हा आजाराला आपण पायबंद घालण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल. वैद्यकीय तज्ञांच्या मते स्वयंशिस्त आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे, यामुळे प्रादुर्भाव कमी होणार आहे. विविध आव्हानाचा सामना करत आरोग्य व्यवस्था त्यांचं काम करीत आहे, या आरोग्यच्या आणीबाणीच्या परिस्थितीत चुका ह्या होणारच मात्र त्या वेळच्या वेळी सोडविणे नागरिकांची अपेक्षा असणे काही गैर नाही.
कोरोनाने विशेषतः महाराष्ट्रात आता रौद्र रूप धारण केलं असून हा विषाणू आता आपले खरे रंग दाखवू लागलाय. तुम्हाला आता ‘स्कोर’ काय झाला आहे, ऐकायची इच्छा होणार नाही इतका रुग्णांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय हे वास्तव मान्य करून नागरिकांनी सतर्क राहण्याचा हाच तो काळ. कोरोनाचा सुरवातीचा काळ संपला असून ‘त्याने’ आता मुंबई आणि महाराष्ट्रासह विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा येथे ‘तांडव’ करण्यास सुरुवात केली असून ही परिस्थिती कायम अशीच राहिल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. या मृत्यूच्या तुफानाला वेळीच अडवणे गरजेचे आहे. त्याकरिता नागकरिकांची साथ लाख मोलाची आहे, वेळीच उपचार घेतल्याने रुग्ण वाचण्याची शक्यता दाट असते. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण डॉक्टराकंडे आल्यानंतर त्याला वाचविणे अडचणीचे होऊन बसते. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टराकंडे गेलेच पाहिजे हे नागरिकांनी मनाशी घट्ट करून ठेवले पाहिजे.
थोडक्यात,बिनधास्तपणा, वाढता हलगर्जीपणा, व नियमांची पायमल्ली यामुळे कोरोना वाढतो आहे.कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी रुपात येत असल्याने फार मोठे आव्हान प्रशासनावर,आरोग्ययंत्रणेवर व सरकारवर आहे.या पार्श्वभूमीवर या कमतरता दूर करून आरोग्य यंत्रणेसह जनतेने अधिक सतर्क राहण्याची नियमांची काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.