आरोग्य

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’

मुंबई : काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार लग्‍न समारंभासाठीची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मीय स्‍थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी छापा टाकण्यात येईल. तिथे मास्‍कचा वापर होत नसेल व ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल. तसेच त्‍या-त्‍या आस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात येतील.

मुंबई पालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त यांच्‍यासह व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्तांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नियमितपणे तपासणी करण्याचे आदेश सर्व २४ सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात दररोज किमान पाच जागांवर छापा टाकून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाईल, तर लग्‍नाचे आयोजक, पालक व संबंधित व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहेत.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक करवाई होणार
– मुंबईत सध्‍या कार्यरत २,४०० मार्शल्सची संख्‍या वाढवून ४,८०० करण्यात येणार आहे. सध्‍या दररोज सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवर कारवाई केली जाते. यापुढे किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई होईल.
– रेल्वेमधून विनामास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्‍येकी शंभर असे एकूण ३०० मार्शल्‍स नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच पोलीसही आता मार्शल म्‍हणून नागरिकांकडून दंड वसूल करू शकतील.
– महापालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये, आदी‍ ठिकाणी पालिकेच्या शिक्षकांची नियुक्‍ती करून विनामास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.
– सर्वधर्मीय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे पालन होत असल्याची खात्री केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button