कोरोनासोबत युद्धाची तयारी; अमित शाह यांनी घेतला लसीकरणाचा आढावा
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यामुळे सरकारदेखील आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने प्रशासनाला कडक निर्देश दिले असून, नागरिकांनाही सूचना दिल्या आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आज अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. यातच गृहमंत्री अमित शाह यांनीही गृह मंत्रालय आणि संबंधित विभागांसोबत आढावा बैठक घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्री अमित शाह यांनी आढावाबैठकी दरम्यान कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणासंदर्भातही माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचनाही केल्या.
देशात महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत कोरोना रुग्णांच्यासंख्येत वाढ होत असताना दिल्लीत मात्र कोरना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीतील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1071 वरून 1041 वर आली आहे. तसेच दिल्लीतील कोरोना संक्रमण दरही 0.3 टक्क्यांवर आला आहे. तर रिकव्हरी दर 98.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.