अर्थ-उद्योग

कोकणातील १०० शेतकर्‍यांच्या देशातील पहिल्या मँगो टेक प्लॅटफॉर्म ‘Myko’चा शुभारंभ!

सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन, 'ग्लोबल कोकण'चा पुढाकार; ५ मार्चला मुंबईत आंब्याच्या पेटीचा लिलाव

मुंबई: कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याची जगभरातील ग्राहकांना थेट विक्री करणाऱ्या ‘Myko’ या मँगो टेक प्लॅटफॉर्मचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला आहे. कोकणातील परिश्रमी १०० शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठानद्वारे पुढाकार घेत शेतकऱ्यांचा देशातील पहिला ‘www.mykofoods.com’ डिजिटल स्टार्टअप बनवण्यात आला. हापूसला जीआय मानांकन मिळवून देणारे माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते याचे उदघाट्न दिल्ली येथे १ मार्च २०२१रोजी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ”आपण स्वतः निर्मिती केलेल्या प्रत्येक उत्पादनाला जीआय टॅगचे मानांकन मिळायला हवे. वर्षभर प्रचंड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला प्राप्त व्हावा तसेच कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे संरक्षण आणि बळकटी मिळायला हवी. Mykoच्या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातूनहे सर्व होण्यास निश्चितच मदत होईल.” अशा भावना सुरेश प्रभू यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. तसेच कोकणातील शेतात पिकलेले हापूस आता थेट मुंबई, पुणे, दिल्ली ते लंडन, युरोप अशा जगभरातील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतील, असेही ते पुढे म्हणाले.

येत्या काही दिवसात या ई-कॉमर्स स्टार्टअपद्वारे हापूस आंब्याच्या विक्रीस सुरुवात होईल. यावेळी ‘MyKo Foods’च्या सह-संस्थापक राजश्री यादवराव, सुनैना राओराणे आणि सुप्रिया मराठे या तीन महिला उद्योजक, कोकण ऍग्रो एक्सपोर्टचे उद्योजक दीपक परब, ‘हिरवळ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष किशोर धारिया आदी मान्यवर उपस्थित होते. ”वर्षभर प्रचंड कष्ट करून हापूसची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, ग्राहकांना संपूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूसची चव घेता यावी यासाठी हा मँगो टेक प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार होणार असल्याने हापूस आंब्याच्या विक्रीत होणारे बाजारीकरण, भेसळ थांबेल. त्यामुळे हा डिजिटल स्टार्टअप निश्चितच एक क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल.” असा विश्वास ‘ग्लोबल कोकण’चे संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केला.

”आंब्याच्या प्रत्येक पेटीवर क्युआर कोड असेल. हा कोड स्कॅन केल्यावर कोणत्या बागेत हा आंबा पिकला आहे, त्याची लागवड कधी झाली, तो पेटीमध्ये कधी पॅक करण्यात आला अशी सर्व माहिती ग्राहकाला कळेल. तसेच शेतकऱ्याच्या संपूर्ण माहितीसह त्याच्या बागेत आंबा लागवडीसाठी केले जाणारे परिश्रम व्हिडिओद्वारे ग्राहकाला पाहता येईल. या सोशल स्टार्टअपच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हापूस आंबा थेट ग्राहकांपर्यंत नेण्याची चळवळ सुरू केली आहे.” असे ‘Myko foods’च्या सह-संस्थापक सुप्रिया मराठे म्हणाल्या. ”रत्नागिरी, देवगड, केळशी येथील आंबा बागायतदार संघटना, आंबा उत्पादक संघ पुढे आले असून हापूसचा समृद्ध वारसा टिकवण्याची जबाबदारी सर्वांनीच घेतली” असल्याचे ‘हिरवळ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष किशोर धारिया यांनी सांगितले. या संपूर्ण उपक्रमाला ‘ऍग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी’ (अपेडा) आणि आणि ‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा’चे सहकार्य लाभले आहे. “हापूस आंबा संपूर्ण देशाचे वैभव आहे. हे वैभव जगभरात पोहचावे यासाठी अपेडा या उपक्रमात सहभागी आहे.” असे अपेडाचे चेअरमन एम.अंगामुथू उदघाटन प्रसंगी म्हणाले.

५ मार्चला मुंबईत आंब्याच्या पेटीचा लिलाव !
आंबा पेटीच्या बुकिंगला १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. मात्र ‘Myko’द्वारे होणाऱ्या आंब्याच्या विक्रीचे पहिले पाऊल म्हणून येत्या ५ मार्च २०२१रोजी मुंबईत कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याच्या १० पेटिंचा लिलावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कोकणातील शेतकरी, आंबा बागायतदार संघटना, उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button