राजकारण

उदयनराजेंची मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता, उदयनराजेंनी फेसबुक अकाऊंटवरुन या भेटीसंदर्भात माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून राज्य सरकारने सुनावणीसाठी गंभीर होण्याची विनंती केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, उदयनराजेंनी काही मुद्द्यांबाबत श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली आहे.

आपण जाणकार आणि अनुभवी आहात म्हणून मी आज तुम्हाला ही विचारणा करीत आहे. कारण आज मराठा तरूण-तरुणी वडिलकिच्या नात्याने मला विचारणा करीत आहेत. मला या प्रश्नांची उत्तरे दिलीत, तर मी सुद्धा आताच्या मराठा तरूण-तरूणीनां देवू शकेन. वरील सर्व बाबींचा आपण नक्कीच विचार कराल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्याल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बोलून दाखवलीय.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कमी पडत असल्याचा खेदही उदयनराजेंनी व्यक्त केला. तसेच, काही मुद्दयांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केलीय. याप्रकरणात तुम्ही स्वत: जातीनीशी लक्ष घालावे. तसेच मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. तशा सक्त सुचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, असे उदयनराजेंनी म्हटलंय. तसेच, खालील मुद्दयांवर श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य सरकारला आदेश द्यावा, जेणेकरून समाजात निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असेही ते म्हणाले.

१ जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातल्या केसवर काही परिणाम होणार आहे का?
२ जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा या केसवर काही परिणाम होईल का?
३ जर ईडब्लूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?
४ महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्या संबंधी जे जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजे. जेणेकरून या खटल्यात सरकारकडून वकिलानां नेमके काय निर्देश दिले गेले आहेत. याचा खुलासा होईल.
५ एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्यूमररी पोस्ट निर्माण करून त्यानां नोकरीत का सामावून घेत नाही?

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजेंनी शरद पवार तसेच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने त्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button