इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
नवी दिल्ली – कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना व्हायरस, भारत-चीन संघर्ष यावरून जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर राहुल यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. इंधन दरवाढीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून जोरदार टीका केली आहे. “वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं।” असं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. तसेच “जून 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती 93 डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या 7 वर्षांत कच्चं तेल 30 डॉलरने स्वस्त झालं. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जात आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“2021 मध्ये 19 वेळा ही दरवाढ झाली आहे. म्हणजेच 45 दिवसांत 19 वेळा किंमत वाढली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या काळात पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झालं आहे” हे सांगणारी आकडेवारी राहुल गांधी यांनी सादर केली आहे. याच दरम्यान पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपाच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असणाऱ्या विश्वास सारंग यांनी वाढत्या इंधनदरांमुळे नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. तसेच यामागचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी सौरऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे आभार मानायला हवेत असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे.