राजकारण

विदर्भवाद्यांचे अर्धनग्न आंदोलन; पोलिसांचा बळाचा वापर

नागपूर : विदर्भ राज्‍य आंदोलन समितीतर्फे ९ ते १५ ऑगस्‍ट दरम्‍यान स्‍वतंत्र विदर्भ राज्‍यांच्‍या मागणीसाठी सुरू असलेल्‍या आंदोलनाच्‍या चौथ्‍या दिवशी पोलिसांनी परत एकदा बळाचा वापर करत आंदोलकांना हुसकावून लावले आणि विदर्भवादी नेते राम नेवले व वामनराव चटप यांना अटक करण्‍यात आली. इतवारीतील शहीद चौक भागात असलेल्‍या विदर्भ चंडिका मंदिराच्‍या सभा मंडपात ९ ऑगस्‍ट क्रांतिदिन ते १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिन या दरम्‍यान विदर्भाचे स्‍वतंत्र राज्‍य व्‍हावे, कोरोना काळातील वीज बिल माफ करावे आणि पेट्रोल व डिझेलची दरवाढ मागे घ्‍यावी, या तीन मागण्‍यांसाठी आंदोलन सुरू होते.

आंदोलनाच्‍या दुस-या दिवशी नेवले, चटप यांच्‍यासह कार्यकर्त्‍यांना अटक केल्‍यानंतर सुटका करण्‍यात आली. आंदोलनकर्त्‍यांनी परत एकदा आंदोलनाला प्रारंभ केला. त्‍यांनी बुधवारी महिला व पुरूष कार्यकर्त्‍यांनी मुंडन आंदोलन केले तर आज चौथ्‍या दिवशी युवा कार्यकर्ते पुढे सरसावले. त्‍यांनी अर्धनग्‍न आंदोलन करून शासनाप्रती रोष प्रकट केला.

आंदोलन झाल्‍यानंतर कार्यकर्त्‍यांचे भोजन सुरू असताना शंभर पोलिसांचे पथक आंदोलनस्‍थळी दाखल झाले आणि त्‍यांनी अटकसत्र सुरू केले. याच दरम्‍यान, आंदोलकांपैकी एक नेते मुकेश मासुरकर यांची तब्‍येत अचानक बिघडली. ते घेरी येऊन खाली पडले आणि त्‍यांना तातडीने काळात रुग्‍णालयात दाखल करण्‍यासाठी नेण्‍यात आले. या घटनाक्रमानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्‍यांना मंदिराच्‍या सभामंडपातून बाहेर काढले. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे या नेत्‍यांना अटक केली तसेच, आंदोलन स्‍थळ असलेल्‍या मंदिराचा परिसर जोरजबरदस्‍तीने रिकामा केला.

आंदोलकांना मार्गदर्शन करताना राम नेवले यांनी मागील अनेक महिन्‍यांपासून कोरोनामुळे सामान्‍यांची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली असताना कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीचा स्‍वीकार राज्‍य शासनाने केला होता पण अजुनही त्‍याची अंमलबजावणी झाली नाही. याउलट जे ग्राहक वीज बिल भरू शकले नाही, त्‍याचे कनेक्‍शन कापण्‍याचा सपाटा शासनाने सुरू केला आहे. हा प्रकार जनतेचा विश्‍वासघात करणारा असून आता शासनाला सत्‍तेत राहण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामुळे ‘चले जाव’चा इशारा देखील त्‍यांनी दिला.

यासोबत वामनराव चटप यांनी विदर्भाची मागणी आजवर सर्व राजकीय पक्षांनी उचलून धरली. पण सत्‍तेत आल्‍यानंतर त्‍याकडे दुर्लक्ष केले. हा विदर्भ द्रोह आहे आणि या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन दडपण्‍याचा प्रकार शासनाच्‍यावतीने होत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

अर्धनग्‍न आंदोलनात सहभाग

आजच्‍या अर्धनग्‍न आंदोलनात मुकेश मासुरकर, सुदाम राठोड, वसंत कुमार चौरसिया, राजेंद्र आगरकर, नरेश निमजे, सतीश प्रेमलवार, प्रशांत मुळे, विजय मौंदेकर, गोविंदराव चिंतावार, संजय हिंगे, मधुकर बालपांडे, नरेश दुरुगकर, प्रफुल बोबडे, अद्वितीय उपगन्‍लावार, निळकंठ आंबोरे यांचा सहभाग होता.

आंदोलन सुरूच राहणार

शासनाच्‍या दडपशाहीला भीक न घालता विदर्भवादी नेते व कार्यकर्ते बेमुदत आंदोलनाच्‍या भूमिकेवर ठाम असून हे आंदोलन मागण्‍या पूर्ण होईस्‍तोवर सुरू राहणार असल्‍याचा निर्धार विदर्भ राज्‍य आंदोलन समितीचे नेते राम नेवले यांनी व्‍यक्‍त केला. शासनाने कितीही बळाचा वापर केला तरी आंदोलन थांबणार नाही. तसेच निर्धारित आंदोलनाचा स्‍वातंत्र्यदिनापर्यंतचा पहिला टप्‍पा राहिल. दुस-या टप्‍प्‍याच्‍या आंदोलनासाठी १४ ऑगस्‍ट रोजी कार्यकारी समितीची बैठक होईल आणि त्‍यात आंदोलनाची आगामी दिशा ठरविण्‍यात येईल, असे चटप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button